Saturday, May 26, 2012

Prabodankar Thakre - हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल

हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि 
हिंदु संस्कृती म्हणजे एक   बिनबुडाचे पिचके गाडगे.......
संदर्भ :-  देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे प्रबोधनकार


काळाच्या कुचाळक्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज `समाजया नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृती म्हणजे एक   बिनबुडाचे पिचके गाडगे

या पेक्षा त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाहीं. यामुळें धर्म संस्कृती संघटण इत्यादि प्रश्नांवर पुराणें प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसें अझून बरींच दणकट राहिलीं आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अझून वाटतें कीं हिंदू समाज अझून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैतानें सडून गेलेली स्वच्छ दिसते, तरी `द्वैतांतच अद्वैत आहेम्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काहीं कमी आढळत नाहींत. परंतु वास्तविक स्थिती विचारवंताना पूर्ण कळलेली आहे. `द्वैतांतच अद्वैतअजमावण्याची भटी योगधारणा आमच्या सारख्या सुधारकांना जरी साधलेली नाहीं, तरी कालचक्राशीं हुज्जत खेळणा-या हिंदू समाजाचें भवितव्य अजमाविण्यासाठी ज्योतिषीबुवांचे पायच कांहीं आम्हाला धरायला नको. सभोंवार परिस्थितीचा जो नंगा नाच चालूं आहे. आत्मस्तोमांच्या टिकावासाठीं भिक्षुकशाहीची जीं कारस्थानें गुप्तपणानें सुरूं आहेत, आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणें भटेतर लोक या कारस्थानांत जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदु समाजाचें भविष्य फारसें उज्ज्वल नाहीं, असें स्पष्ट
नमूद करायला या लेखणींस फार कष्ट होत आहेत. निराशाजनक अशाहि अवस्थेंत हिंदुसमाज जगविण्याचे कांहीं राजमार्ग आमच्या धर्मबांधवास सुचविणें हेंच वास्तविक प्रबोधनाचें आद्य कर्तव्य आहे.
संदर्भ :-  देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे प्रबोधनकार


No comments:

Post a Comment